मंगळवेढा, दि.६ : खते, मजुरी व इतर निविष्ठांच्या बाबतीत प्रचंड महागाई वाढलेली असताना सर्वच शेतमाल व ऊसाला मात्र अजूनही २०१२ साली दिला जाणाराच दर मिळत आहे त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करीत आहे. अनेक साखर कारखानदार रिकव्हरी चोरून व काटा मारून शेतकऱ्यांची लूट करत आहेत, परंतु यापुढे अशा लुटारू साखर कारखानदारांचा लवकरच बंदोबस्त केला जाईल,असे इशारा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांनी दिला आहे.
मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे शेतकरी संघटनेच्या शाखा उद्घाटनानंतर पार पडलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, पूर्वी शेतकरी अशिक्षित असल्यामुळे अन्याय सहन करत होते परंतु आता शेतकऱ्यांची पोरं शिकून संघटित झालेली असल्यामुळे अशा शेतकरी राजाची फसवणूक करणाऱ्या लुटारू साखर कारखानदारांच्या गाड्या पेटवल्याशिवाय शेतकरी स्वस्त बसणार नाही.
यावेळी व्यासपीठावर सोलापूर युवा जिल्हाध्यक्ष औदुंबर मोरे, सांगोला तालुकाध्यक्ष हनुमंत चौगुले, पंढरपूर तालुकाध्यक्ष सुभाष चौगुले, बार्शी तालुकाध्यक्ष सचिन आगलावे, मंगळवेढा तालुकाध्यक्ष सिद्धाराम काकनकी, सिध्दापूरचे संतोष सोनगे, उपसरपंच सचिन चौगुले, सुनील बिराजदार, अमोगसिध्द काकनकी, महेश तळ्ळे, ओगेप्पा मलकारी, बाळासाहेब काकनकी, श्री.अंजुटगी, सागु मलकारी, गुरप्पा भरमगोंडे, सुनिल काकनकी, कोंडाजी तांबोळी, नैम तांबोळी, शांतय्या स्वामी, राकेश कपले, आपन्ना भरमगोंडे, अनिल काकनकी, प्रकाश भरमगोंडे, सिध्दाराम कोळी, मुदका कोळी, चंद्रकांत कोळी, सुनिल कोरे, युवराज कुरे, सागर खबाले, महादेव जाधव आदीसह पंचक्रोशीतील बहुसंख्य शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी औदुंबर मोरे, हनुमंत चौगुले, सुभाष चौगुले, सचिन आगलावे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंगळवेढा तालुकाध्यक्ष सिद्धाराम काकनकी यांनी तर आभार विशाल फरकंडे यांनी मानले.