सोलापूर, दि.06 : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक शाखेने तयारी आरंभ केली आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक कर्तव्यासाठी घ्यावयाच्या याद्या अद्ययावत कराव्यात व ज्यांना निवडणूक कर्तव्यातून सवलतीची मुभा आहे अशी नावे आरंभीच्या टप्प्यात वगळून नियोजन करावे अशी मागणी शिक्षक समितीच्या सोलापूर जिल्हा शाखेने निवेदनाद्वारे केली आहे.
विधानसभा निवडणुकांसाठी प्राथमिक शिक्षकांना निवडणूक कर्तव्यासाठी नियुक्त करताना पगार पत्रकाच्या याद्यानुसार सरसकट आदेश दिले जातात. तथापि एन.आय.सी.कडे याद्या सादर करण्यापूर्वी संबंधित तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी व आस्थापना लिपिक यांचे विशेष कँप जिल्हा निवडणूक शाखेत आयोजित करुन निवडणूक कर्तव्यात सवलत असलेल्या कर्मचाऱ्यांची नावे पहिल्या टप्प्यात वगळून याद्या अपडेट करण्यात याव्यात अशी मागणी निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी गणेश निराळी यांच्याकडे केली आहे. शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष सुरेश पवार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हा निवडणूक शाखेला भेट देऊन निवडणूक कालावधीत शिक्षकांना येणाऱ्या अनुभवांची माहिती दिली. दिव्यांग , दुर्धर आजारग्रस्त शिक्षक, बी.एल.ओ, गरोदर महिला कर्मचारी, बालसंगोपनाची जबाबदारी असलेल्या महिला अशा कर्मचाऱ्यांच्या वास्तव अडचणी विचारात घेऊन याद्या तयार करणे आवश्यक आहे. मात्र पूर्वानुभव विचारात घेता पहिल्या, दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तालुका निवडणूक शाखेकडून ही नावे वगळली जातात. मात्र या काळात संबंधित कर्मचाऱ्यांना प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते, शिवाय यामध्ये सहेतुक गैरप्रकार देखील होतात ही बाब चर्चेत ठामपणे मांडण्यात आली.
ऐनवेळी सवलत देण्यात आलेली ही नावे कमी झाल्याने पुन्हा पुरेशी यंत्रणा उभी करताना नव्याने आदेश काढावे लागतात जातात, पुन्हा नव्याने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण द्यावे लागते. त्यामुळे प्रशासनाला देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. हे सर्व टाळण्यासाठी एन.आय. सी. कडे याद्या सादर करण्यापूर्वीच त्या दुरुस्त करण्यात याव्यात त्यामुळे प्रशासन व कर्मचारी यांना होणारा नाहक त्रास दूर होईल ही भूमिका यावेळी मांडण्यात आली. यावेळी निवडणूक शाखेच्या तहसीलदार अर्चना निकम, कक्ष अधिकारी प्रविणकुमार घम हेही उपस्थित होते. शिक्षक समितीच्या वतीने मांडण्यात आलेल्या सूचना रास्त असून नियोजन करताना याबाबत निश्चितच विचार केला जाईल असे उपजिल्हाधिकारी गणेश निराळी यांनी सांगितले.
निवेदनाद्वारे मांडण्यात आलेल्या बाबी-
1) दुर्धर आजारग्रस्त शिक्षक व दिव्यांग शिक्षकांना निवडणूक कर्तव्यातून सवलत द्यावी.
2) बी. एल.ओ. म्हणून कार्यरत शिक्षकांची नावे सुरुवातीलाच यादीतून वगळण्यात यावीत.
3) सर्व आस्थापनातील पुरुष कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेत सामावून घेतल्यास महिला भगिनींना निवडणूक कर्तव्यातून वगळणे शक्य होईल त्यादृष्टीने सुरुवाती पासूनच नियोजन करण्यात यावे.
4) प्राथमिक शिक्षकांना निवडणूक केंद्राध्यक्ष म्हणून ड्यूटी देऊ नये.
5) वयाची 55 वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना निवडणूक कर्तव्यातून सवलत द्यावी.
यावेळी शिक्षक समितीचे नेते अनिल कादे , राज्य उपाध्यक्ष राजन सावंत , ज्येष्ठ नेते विकास उकीरडे, विभागीय उपाध्यक्ष मो.बा.शेख, सरचिटणीस शरद रुपनवर, ज्येष्ठ नेते पंडीत कोरे, मंगळवेढा शाखेचे अध्यक्ष विठ्ठल ताटे, बार्शी शाखेचे अध्यक्ष संजय पाटील यांच्यासह शिक्षक समितीचे जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते .