मंगळवेढा तालुका ज्वारीबरोबर ज्ञानाचेही कोठार असल्याचा अभिमान : आमदार समाधान आवताडे

मंगळवेढा येथे पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षकांचा सन्मान

मंगळवेढा, दि.06 : शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या क्षमता लक्षात घेऊन शिक्षण दिले तर त्यांच्या गुणवत्तेत निश्चितच वाढ होते हे मंगळवेढा तालुक्यातील शिक्षकांनी दाखवून दिले आहे. मंगळवेढा तालुका हे जसे ज्वारीचे कोठार आहे तसे ते ज्ञानाचेही कोठार असल्याचे पाहून आनंद झाला व याचा मला अभिमान आहे असे प्रतिपादन पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी केले.

ते मंगळवेढा येथे पंचायत समिती शिक्षण विभाग मंगळवेढा यांच्यावतीने आयोजित तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक विभागाच्या उपशिक्षणाधकारी रुपाली भावसर ह्या होत्या. यावेळी व्यासपीठावर तन्हाळी मठाचे मठाधिपती दाजी महाराज, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर, माजी उपसभापती दादा गरंडे, पंढरपूरचे माजी उपसभापती बाळासाहेब देशमुख, नितीन नकाते, विनायक यादव, अशोक चौडे, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी पोपट लवटे, बजीरंग पांढरे, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष सुरेश पवार, शिक्षक नेते संजय चेळेकर, गटशिक्षणाधिकारी डॉ.बिभीषण रणदिवे, शिक्षण विस्तार अधिकारी भीमाशंकर तोडकरी, शामराव सरगर, सुदर्शन शेजाळ, धनंजय पाटील, विष्णू चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तर नूतन हायस्कूल बोराळेच्या विद्यार्थिनीनी स्वागतगीत सादर केले.

आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात तालुक्यातील प्राथमिक विभागातील केंद्रप्रमुख, सहशिक्षक, सहशिक्षिका तसेच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा एक अंतर्गत तालुक्यातील यश संपादन केलेल्या प्राथमिक व माध्यमिक शाळांचा गौरव करण्यात आला.

शिक्षक पुरस्कार निवडीसाठी विविध निकष लावण्यात आले व आदर्श शिक्षकांची निवड करण्यात आली यामुळे आदर्शवत काम करणाऱ्या शिक्षकांना आपल्या कामाची पावती मिळाली आहे असे नमूद करून आमदार आवताडे पुढे म्हणाले, शिक्षकांनी आपल्या अंगी असलेल्या कलेचा वापर करून गुणवत्ता वाढीसाठी वेगवेगळे प्रयोग करायला हवेत. आमदार म्हणून काम करत असताना गेल्या तीन वर्षात 3000 कोटींची कामे केली. सध्या शिक्षण क्षेत्रात एक विद्यार्थी एक झाड या उपक्रमांतर्गत 50 हजार वृक्षांचे रोपण करण्यात आले त्यामुळे निसर्गाचा समतोल साधण्याचे काम होणार आहे. तुमच्यावर वेळोवेळी दिलेली जबाबदारी तुम्ही पार पाडली आहे, भविष्यातही मी दिलेली जबाबदारी आपण पार पाडाल असा मला विश्वास आहे. आपली अशैक्षणिक कामे कमी करण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असल्याचे आमदार आवताडे यांनी यावेळी सांगितले.

अध्यक्षस्थानावरून बोलताना रूपाली भावसर त्यांनी सांगितले की, शिक्षक हा समाज घडवीत असतो तर विद्यार्थी हा या शिक्षकाकडे आदर्श म्हणून पाहत असतो. शिक्षक असणे ही अभिमानाची बाब असून विद्यार्थ्याकडून मिळणारा मान खूप महत्त्वाचा आहे. सध्या विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीने शिक्षकांनी दक्ष राहिले पाहिजे. मुलांना संभाळताना आपली जबाबदारी किती महत्त्वाचे आहे व समाजाचे नाव तुमच्यामुळे पुढे जाणार आहे हे लक्षात घेऊन कर्तव्य भावनेने काम करावे. यावेळी पुरस्कार प्राप्त रोहिणी तेली, निवास माळी, रूपाली तानगे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी डॉ.बिभीषण रणदिवे, सूत्रसंचालन दत्तात्रय कारंडे व मंगल बनसोडे यांनी केले तर आभार दिगंबर तोडकर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here