स्वतःच्या प्रभावी, सर्वस्पर्शी लेखनातून व प्रेमळ स्वभावाने पत्रकारितेत व जनमानसात कायमचा आगळा-वेगळा ठसा उमटविलेला प्रचंड उत्साही, प्रवाही व त्याचबरोबर जनसंपर्कवादी व समन्वयवादी माझा जिवलग मित्र अभय दत्तात्रय दिवाणजी हा सुमारे 37 वर्षे यशस्वी चौफेर पत्रकारिता करुन आज वयाच्या 57व्या वर्षी पत्रकारितेतून सेवानिवृत्त होत आहे, त्यानिमित्त त्याच्या कार्यकर्तृत्वावर टाकण्यात आलेला हा एक छोटासा प्रकाशझोत.
चांदण्याच्या शीतलतेप्रमाणे शांत व सूर्याच्या तेजाप्रमाणे तेजस्वी असलेल्या अभय आणि माझ्यातील दोस्ताना अखंडित 37 वर्षांचा आहे.त्यावेळी आम्ही दोघेही कॉलेजला होतो,मी 24 वर्षांचा तर तो 20 वर्षांचा होता.मी तरुण भारतमध्ये आजचे मराठी पत्रकार संघाचे नेते एस. एम. देशमुख यांच्याबरोबर कार्यरत होतो,तेव्हा भरारी प्रतिनिधी म्हणून अभय हा देशमुख यांची पत्नी व भरारी संयोजक शोभा कुलकर्णी यांच्याकडे नेहमी येत असे.त्यावेळी झालेली भेट ही पक्क्या मैत्रीत रूपांतरित होत राहिली व टिकली आहे. आमच्यातील मैत्री ही मी माझी सर्वोत्तम कमाई समजतो. अभयचे प्रत्येकवेळचे “चालणं-बोलण-वागणं” हे फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन असेच असते.
महाराष्ट्रातील एक ख्यातनाम पत्रकार हे अढळपद आज अभयला सहज मिळालेले नाही, कोणताही वारसा नसताना त्याने आपल्या कार्यकर्तृत्वाने, जिद्द व परिश्रमाने ते स्थान मिळविले आहे. सुरुवातीच्या काळातच आम्हा दोघांना विद्यार्थी परिषदेचा संस्कार व गुरुवर्य विवेक घळसासी यांचा परिस्स्पर्श लाभलेला आहे, हे येथे उल्लेखनीय.
अभयचा जन्म हा श्री स्वामी समर्थांच्या अक्कलकोट नगरीतला असला तरी त्याचे मूळ गाव त्याच तालुक्यातील हन्नूर होय. घरची परिस्थिती गरिबीची असल्याने स्वलंबनाचा मार्ग स्वीकारून त्याला अक्कलकोट येथे बी. कॉम.पर्यतचे शिक्षण पूर्ण करावे लागले,त्यानंतर त्याने टिळक विद्यापीठातून बी.जे.ची पदवी घेतली. शिक्षणासाठी त्याला सराफाच्या दुकानात झाडण्याचे तसेच अकौंट लिखाणाचे,वन विभाग व पीडब्ल्यूडीकडे रस्त्यावर जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांची नोंद करायची कामे करावी लागली, त्याची त्याला जाणीव त्यामुळेच तो आज इतकी प्रचंड गरुडझेप घेऊनसुद्धा जमिनीवर, जनसामान्य व मित्रांबरोबर आहे.
ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असू द्यावे समाधान-सदैव अशा भूमिकेत असलेला माझा मित्र अभय हा आज महाराष्ट्रातील ख्यातनाम दैनिक सकाळच्या सोलापूर आवृत्तीच्या निवासी संपादकपदावरून निवृत्त होत आहे.हा निर्णय त्याला प्रकृतीच्या कारणावरून डॉकटरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार घ्यावा लागला आहे. नियमानुसार वयाच्या 58 व्यावर्षी निवृत्ती असते पण एक वर्ष अगोदरच तो सेवानिवृत्त झाला आहे. यापुढील त्याचे वास्तव्य पुण्यात मुलाकडे असले तरी त्याने सोलापूर व अक्कलकोटशी कायमचा ऋणानुबंध ठेवण्याबाबत घेतलेला निर्णय मनाला समाधान देणारा आहे व या जिल्ह्यासाठी योग्य आहे.
मान्यवरांच्या यादीत स्थान – स्वतः प्रचंड उत्साही व प्रवाही राहात व प्रत्येक दिवशी सर्वस्पर्शी जनसंपर्क वाढवत त्याने चौफेर लिखाण केले व अनेक विषय व प्रश्नांना वाचा फोडून न्याय मिळवून दिला आहे. माझ्या माहितीनुसार पत्रमहर्षी कै.रंगाआण्णा वैद्य,सोलापूरचा चालता- बोलता इतिहास कै.व्ही. आर.(तात्या) कुलकर्णी, कै.वसंतराव एकबोटे, कै. सुभाष कोरे व ज्येष्ठ निरूपणकर,गुरुवर्य विवेकजी घळसासी यांच्यानंतर तयार होत असलेल्या चौफेर व व्यासंगी पत्रकारांच्या यादीत अभय याचे अव्वल क्रमांकाचे आहे. कारण अभय हा केवळ लिखाण करीत नाही तर, त्याचे संवाद कौशल्य जबरदस्त प्रभावी आहे. त्याने अनेक कार्यक्रमातील भाषणातून आपला प्रभाव व विचार उमटविला आहे. विशेष म्हणजे त्याने जवळपास अठरा वर्षे क्राईम रिपोर्टींग केले, या क्षेत्रातला पत्रकार हा संपादक होतो व त्या पदावर टिकतो हे विशेषच म्हणावे लागेल. शिवसेनेचे प्रवक्ते व सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनीही क्राईम रिपोर्टिंग करीत उच्चपदावर मजल मारली आहे. त्या मालिकेत आता अभयचा नंबर लागतोय. अभयच्या स्वभावाचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे त्याची सदैव वाऱ्यावर स्वार होण्याची तयारी असते. 37 वर्षांच्या पत्रकारितेत त्याने तरुण भारत, संचार, लोकमत,पुढारी व सकाळ या पाच वेगवेगळ्या विचारांच्या दैनिकात सेवा बजावली आहे.त्याने सोलापूर आकाशवाणीचे नैमितिक प्रतिनिधी म्हणून तीन वर्षे काम केले आहे. प्रत्येक ठिकाणचे राग-लोभ,चढ-उतार सहन करत त्याने आपली लेखणी, पत्रकारिता मिरविली व गाजवली आणि त्यात अनेकांची जिरवली,असे म्हटले तर काही वावगे वाटण्याचे कारण नाही. कॉलेजला असताना त्याने 1987ला तरुण भारतचा भरारी प्रतिनिधी म्हणून पत्रकारितेचा श्रीगणेशा केला.तेथून त्याला लागलेली गोडी पुढे वाढतच गेली. गुटखाबंदीचा विषय असो की उजनीच्या पाण्याचा विषय, विंचूरच्या स्मशानभूमीचा विषय, सोलापूरच्या स्मार्ट सिटीचा विषय त्याने पोटतिडिकीने नुसते मांडलेच नाहीत तर ते प्रश्न सोडविले. जिल्हा परिषद शाळांच्या सक्षमीकरणाच्या विषयाने तर चार चांद लावले. अहमदाबादच्या आय आय एममध्ये सन्मानित व्याख्याते म्हणून सादरीकरणाची संधी मिळाली. सोलापूरची ही यशोगाथा आंतरराष्ट्रीय पातळीवर गेली, हे विशेष. उद्योग, पाणी, स्मार्ट सिटी, समाज, जलस्रोतांचे सक्षमीकरण, ह्युमन टच स्टोरी ही त्याची बलस्थाने.
पत्रकार संघ व इतर कार्य – “आनंदाच्या डोही आंनद तरंग” असलेल्या अभयने 1996-2010 या काळात सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्ष,उपाध्यक्ष, सरचिटणीस,खजिनदार व कार्यकारिणी सदस्य, सल्लागार या पदांवर राहून उल्लेखनीय कार्य केले आहे.सध्या तो अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा आजीव सदस्य असून तेथील पुरस्कार निवड समितीचा अध्यक्ष आहे.तो इंडियन रेडक्रॉस सोसायटीचा आजीव सदस्य आहे. याशिवाय त्याने विधी सेवा प्राधिकरण, विद्यापीठ व मेडिकल रॅगिंग समिती, बीएमआयटी कॉलेज व सोनामाता शिक्षण संस्था आदी ठिकाणी सदस्य म्हणून काम केले आहे. सध्या त्याची सकाळमधील अध्यात्मिक विंगमध्ये श्री स्वामी समर्थांची सेवा चालू आहे.
पुरस्कार रकमेतून अन्नदान – माणसं जोडण्यासाठी व संस्था उभ्या करण्यासाठी आवश्यक असलेली सकारात्मक, विकासाभिमुक भूमिका हे अभयच्या पत्रकारितेचे खास वैशिष्टय होय. त्याच्या पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल अनेक सन्मान व पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. 1998 ते 2023 या काळात त्यास शहर, जिल्हा व राज्य पातळीवरील पंचवीस पेक्षा जास्त पुरस्कार मिळाले आहेत.विशेष म्हणजे या पुरस्काराच्या माध्यमातून आलेल्या रकमेत स्वत:ची तेवढीच रक्कम घालून ती रक्कम त्याने वृद्धासाठी असलेल्या अन्नपूर्णा योजनेसाठी दिली आहे. वाढदिवसानिमित्त हार, शाल, बुके न घेता रोख रक्कम घेऊन त्यात तितकीच रक्कम घालून आपले योगदान तो देतो ही बाब कौतुकास्पद, अभिनंदनीय व प्रेरणादायी आहे. त्याची ही कृती कवी वि. वा. शिरवाडकर यांच्या “देणाऱ्यांनी देत जावे,घेणाऱ्यांनी घेत जावे अन एक दिवस घेणाऱ्यांनी देणाऱ्याचे हात घ्यावे“या काव्यपंक्तीप्रमाणे आहे.
सर्वाथाने संपन्न कुटुंब – शांत,संयमी व मनमिळाऊ असलेल्या अभयचे कुटुंब आज सर्वाथाने संपन्न आहे. त्याची पत्नी विशाला वहिनी यांनी सामाजिक कार्याला वाहून घेतले आहे,त्या भगिनी समाज ट्रस्टच्या अध्यक्षा असून समुपदेशनाचे काम करीत आहेत. मुलगी आलेखा ही इंजिनियर असून एल अँड टी माईंडट्री कंपनीमध्ये इंजिनियर मुलगा आयुष हा टाटा कम्युनिकेशनमध्ये नोकरीला आहे. त्या दोघांना राज्य व राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार मिळाले आहेत, विशेष म्हणजे आयुषने पुरस्काराच्या माध्यमातून मिळालेल्या रकमेतून स्वतःचे डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले आहे. 24 वर्षे वयाच्या आयुषने वडिलांच्या सामाजिक कार्याचा वारसा घेत आतापर्यंत बारावेळा रक्तदान केले आहे.अशा सर्वसंपन्न मित्रास व त्याच्या परिवारास चांगल्या आरोग्यासाठी व प्रगतीसाठी लाख-लाख हार्दिक शुभेच्छा…!
स्वामी समर्थांच्या कृपेमुळे मृत्यूच्या दारातून परत
प्रत्येकजण आयुष्यभर विद्यार्थी असतो त्याप्रमाणे पत्रकार हा कधी निवृत्त होत नसतो. पण आता अभयला प्रकृतीच्या कारणावरून नाईलाजास्तव निवृत्त व्हावे लागत आहे. त्याच्यावर दोन मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत, डॉकटरांनी त्याची हमी दिली नव्हती. श्री स्वामी समर्थांच्या कृपेमुळे तो बरा झाला. फिनिक्स पक्षी राखेतून पुन्हा कसा उभा राहतो, त्याप्रमाणे आज उभा आहे, त्याच्या या पुनर्जन्मासाठी विशाला वहिनींना सावित्रीची भूमिका वठवावी लागली. एकदा तो पुण्यातील रुबी रुग्णालयात ऍडमिट होता, त्यावेळी त्याने माजी मंत्री सुशीलकुमार शिन्दे यांच्यावरील “सप्तरंग”चा कॉलम लिहून दिला होता. विशेष म्हणजे कोरोना काळात तो मार्कंडेय रुग्णालयात उपचार घेत असताना तेथून लॅपटॉपवर काम करून पंधरा दिवस अंक काढला होता.
एक मित्र- दशरथ वडतिले,
माजी अध्यक्ष, सोलापूर श्रमिक पत्रकार संघ. 9422457100