निमित्त वार्षिक सर्वसाधारण सभेचे, गौरव गुणवंतांचा ; श्री संत दामाजी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

सभेत महात्मा फुले गुणवंत शिक्षक, आदर्श शाळा पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कारांचे वितरित

मंगळवेढा, दि.२७ : श्री संत दामाजी प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित मंगळवेढा च्या१८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त व मंगळवेढा तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने महात्मा फुले गुणवंत शिक्षक, आदर्श शाळा, गुणवंत विद्यार्थी जीवनगौरव पुरस्कार वितरित करण्यात आले. 

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे व मंगळवेढा- पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन व पुरस्कार वितरण करण्यात आले. या पतसंस्थेचे चेअरमन विष्णू आसबे यांनी पतसंस्थेची पार्श्वभूमी व कामकाजाबद्दल माहिती दिली तसेच संस्थेचे सचिव मोहन लेंडवे यांनी अहवालाचे वाचन केले. सर्व सभासदांनी टाळ्यांच्या गजरात अहवाल वाचन व सर्वसाधारण सभेतील सर्व विषय बहुमताने मंजूर केले. यामध्ये संस्थेची कर्ज मर्यादा सहा लाखावरून सात लाखापर्यंत वाढविण्याचा ठराव व सभासदांच्या भाग भांडवलावर लाभांश 12% देण्याचा ठराव ही सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदेत शिक्षकांच्या प्रश्नांवर व अशैक्षणिक कामासंदर्भात आवाज उठवणार असल्याचे सांगितले. शिक्षक हाच खरा समाज घडवतो. त्यांना फक्त शिकवण्याचेच काम दिले जावे असे आवर्जुन सांगितले.

आमदार समाधान आवताडे यांनी मंगळवेढा तालुक्यातील गुणवत्ता उत्कृष्ट असून शिक्षक हा स्ट्राँग राहिला तरच देशाचे भवितव्य घडणार आहे. शिक्षकांच्या प्रश्नासंदर्भात नेहमीच सहकार्य केले जाईल असे अभिवचन दिले. संभाजीराव थोरात यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना शिक्षकांच्या प्रश्नांविषयी भूमिका मांडली. यामध्ये मुख्यालय राहण्याविषयी चा जो शासन निर्णय आहे त्याबाबत बदल करणे, अशैक्षणिक कामामध्ये BLO चे काम शिक्षकांना रद्द करण्याबाबतचा शासन निर्णय नुकताच महाराष्ट्र राज्याने पारित केला आहे त्याबाबतची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच नोव्हेंबर 2005 नंतर जे शिक्षक नियुक्त झालेले आहेत त्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी असे परखड मत त्यांनी आपल्या अध्यक्ष मनोगतातून व्यक्त केले तसेच पंचवीस टककेपर्यंत अशैक्षणिक कामे संघटनेच्या पाठपुराव्यामुळे कमी करण्यात आले असल्याची त्यांनी माहिती दिली. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची ताकद शासनकर्त्यांना निश्चितच माहिती असल्याचे त्यांनी सांगितले. पतसंस्थेच्या कामाबद्दल अभिनंदन करून संस्थेचे पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र राज्य नगरपालिका महानगरपालिका शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस संजय चेळेकर यांनी शिक्षकांना देण्यात येणाऱ्या अशैक्षणिक कामाबद्दल नाराजी व्यक्त केली व आम्हाला फक्त विद्यार्थ्यांना शिकवू द्या याबद्दल राज्यव्यापी आंदोलन केले असल्याचे सांगितले व जिल्हा परिषद, नगरपालिका/ महानगरपालिका शाळा टिकल्या पाहिजेत व गोरगरीबांच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षणाची दारे कायमस्वरूपी खुली राहिली पाहिजेत अन्यथा भविष्यामध्ये खूप मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल अशी खंत व्यक्त केली, त्यासाठी पालकांमधून देखील उठाव झाला पाहिजे असे त्यांनी परखडपणे सांगितले. यावेळी सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष अनिरुद्ध पवार यांनी जिल्ह्यातील शिक्षकांच्या समस्येवर लोकप्रतिनिधी यांना अवगत केले व सर्व पुरस्काराने सन्मानित शाळा,शिक्षकांचे अभिनंदन केले.

यावेळी महिला आघाडी जिल्हाध्यक्षा चंदाराणी आतकर , मनिषा पवार, राजू रायबान यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थित सभासदांना गजानन रत्नपारखी ज्वेलर्स यांच्या सौजन्याने लकी ड्रॉ काढण्यात आला व बक्षीस वितरण करण्यात आले. नुतन मुख्याध्यापक पदोन्नती मिळालेले शिक्षक, पवित्र पोर्टल द्वारे नियुक्ती मिळालेले शिक्षक, शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षक व विद्यार्थी,सेट नेट उत्तीर्ण शिक्षक, एम बी बी एस उत्तीर्ण शिक्षक पाल्य,  नुतन वैद्यकीय अधिकारी यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंगळवेढा तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संभाजी तानगावडे, सर्व पदाधिकारी, महिला आघाडीच्या अध्यक्षा उषा कोष्टी, व्हाईस चेअरमन धनाजी नागणे, शिक्षक संघ पदाधिकारी, पतसंस्थेचे सर्व संचालक यांनी परिश्रम घेतले. आभार कविराज दत्तू यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here