मंगळवेढा, २५ : ग्रामीण भागात शेतकऱ्याच्या मुलाला नोकरी लागली म्हणजे साऱ्या कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर येऊन पडते. कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना खूप आर्थिक अडचणी येतात अशावेळी शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अडचणीसाठी उभ्या करण्यात आलेल्या शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थांनी मोलाची भूमिका बजावली आहे असे मत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक महामंडळाचे राज्याध्यक्ष तानाजी माने यांनी व्यक्त केले.
ते गुंजेगाव (ता.मंगळवेढा) येथील स्वामी विवेकानंद विद्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या मंगळवेढा तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षक सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित मंगळवेढा च्या ३५ व्या वार्षिक साधारण सभेत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे चेअरमन सुहास गोपाळकर हे होते. यावेळी व्यासपीठावर नेताजी सुभाषचंद्र बोस शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष प्रभाकर घुले, पदाधिकारी विलास आवताडे, रावसाहेब चौगुले, सोलापूर जिल्हा शिक्षक सोसायटीचे संचालक राजेंद्र माळी, राज्य मुख्याध्यापक संघ सचिव राजेंद्र नलवडे, स्वामी विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक शशिकांत ढगे, महादेव ढोणे, नागू सावंत, श्री.जालगिरे, श्री.चाबुकस्वार, मंगळवेढा तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षक सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित मंगळवेढाचे व्हाईस चेअरमन रावसाहेब कोळेकर, माजी चेअरमन पंडित पाटील, संचालक रमेश डोके, गणेश यादव, बाबू सावंत, प्रा.विनायक कलुबर्मे, दिलीप चंदनशिवे, शांतीलाल कदम, संगीता कदम, स्नेहा मसरे, तज्ञ संचालक तानाजी पाटील, माजी सचिव ज्ञानोबा फुगारे, सचिव बाळासाहेब जावळे तसेच सल्लागार मंडळ उपस्थित होते.
स्वामी विवेकानंद विद्यालय, गुंजेगाव येथील विद्यार्थिनींनी सादर केलेल्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी सेवानिवृत्त सचिव ज्ञानोबा फुगारे यांचा सेवापूर्तीनिमित्त मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला तर सहसचिव बाळासाहेब जावळे यांना पदोन्नती देऊन सचिव पद देण्यात आल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच सेवानिवृत्त झालेले सभासद, नवनियुक्त मुख्याध्यापक, गुणवंत विद्यार्थी, गत वर्षातील विविध पुरस्कार प्राप्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला.
तानाजी माने पुढे म्हणाले, १९९० साली आपल्या पूर्वजांनी उभारलेल्या मंगळवेढा तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सेवकांच्या पतसंस्थेत अतिशय स्वच्छ व चांगल्या पद्धतीने चाललेला कारभार पाहिल्यानंतर आनंद होतो आहे. शिक्षक बांधवांची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर त्याची मनस्थिती चांगली असते व ज्यांची मनस्थिती चांगली असते तेच आपल्या विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने न्याय देऊ शकतात आणि म्हणून शिक्षकांची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे मोठे काम या पतसंस्थेने केले आहे. शिक्षण क्षेत्रात मोठमोठे बदल घडवून येत आहेत. हे बदल घडून येत असताना शिक्षण क्षेत्रातील मारक गोष्टींना विरोध करून चांगल्या गोष्टीला सामोरे जात आपण दोन पाऊल पुढे होत शिक्षण पद्धतीतील बदल स्वीकारणे आवश्यक आहे. अनुदानित शाळा बंद पडल्या तर शेतकऱ्याची मुले शिक्षणापासून वंचित राहतील. खरी गुणवान मुले ही ग्रामीण भागातच असल्याने या मुलांना चांगले शिक्षण दिले पाहिजे.
अध्यक्षस्थानावरून बोलताना चेअरमन सुहास गोपाळकर म्हणाले, गत वर्षी संस्थेला एक कोटी चाळीस लाख रुपये झाला असून कर्ज व्याजदरा एवढाच म्हणजे आठ टक्के लाभांश सभासदांना देण्यात येणार आहे. आम्ही सर्व संचालकांनी नेहमीच सहकार्याची भूमिका घेत संस्थेची प्रगती कशी होता येईल याबाबत निर्णय घेतले. गेल्या ३५ वर्षापूर्वी शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या गरजा ओळखून निर्माण केलेली या पतसंस्थेचे आता वटवृक्षात रूपांतर झाली आहे. संस्थारुपी वटवृक्ष अधिक भरण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे आवश्यक आहे. मार्च २०२४ अखेर संस्थेचे भाग भांडवल ७ कोटी ९९ लाख, कायम ठेव ६ कोटी २४ लाख तर संजीवनी ठेव १ कोटी ५८ लाख रुपये आहे.
प्रास्ताविकात माजी चेअरमन पंडित पाटील यांनी सांगितले की, गेल्या आर्थिक वर्षात मयत झालेल्या सभासदांच्या कुटुंबाला आर्थिक बळ देण्याचे काम संजीवनी ठेव योजनेतून करण्यात आले. या सभेच्या निमित्ताने सेवानिवृत्त सभासद, नवनियुक्त मुख्याध्यापक, गुणवंत विद्यार्थी यांचा सन्मान करताना आम्हाला अत्यानंद होत आहे. सर्व सभासदांच्या सहकार्याने या पतसंस्थेची वाटचाल सुरू आहे.
सभेत पतसंस्थेचे माजी चेअरमन राजकुमार धनवे यांनी संस्थेचे उत्पन्न कशा रीतीने वाढवता येईल व खर्च कसा कमी करता येईल यासाठी मार्गदर्शक सूचना केल्या. सभेत मंगळवेढा तालुक्यातील प्राथमिक आश्रमशाळेतील शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांना सभासद करून घेणे, संजीवनी ठेव योजनेअंतर्गत मयत सभासदांच्या कुटुंबाला देण्यात येणाऱ्या मदतनिधीत वाढ करणे, शेअर्स व कर्ज रकमेत वाढ करणे याबाबत विषय घेऊन ते मंजूर करण्यात आले.
सर्वसाधारण सभेप्रसंगी मानपत्राचे वाचन संचालिका स्नेहा मसरे व संगीता कदम यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र जाधव यांनी तर आभार तज्ञ संचालक तानाजी पाटील यांनी मानले.