इवलेसे रोप लवियेलें द्वारी । त्याचा वेलू गेला गगनावरी ; मंगळवेढा तालुका सोसायटीला एक कोटी चाळीस लाखाचा नफा

मंगळवेढा तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सेवक पतसंस्थेची रविवारी वार्षिक सर्वसाधारण सभा : चेअरमन सुहास गोपाळकर यांची माहिती

मंगळवेढा, दि.२४ : मंगळवेढा तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित मंगळवेढा या संस्थेची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. २५ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी १२ वाजता स्वामी विवेकानंद विद्यालय गुंजेगाव येथे होत असल्याची माहिती पतसंस्थेचे चेअरमन सुहास गोपाळकर यांनी दिली.

या सभेत आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दत्ताजीराव भरत लाळे हे भूषविणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे राज्याध्यक्ष तानाजी माने हे उपस्थित असणार आहेत.

चेअरमन सुहास गोपाळकर म्हणाले, आपली पतसंस्था त्याग आणि एकीतून उभी राहत वाढलेली आहे, त्यामुळे हा ३५ वा वार्षिक अहवाल सादर करीत आहोत. विकासाचे सारेच मार्ग सहकारातून जातात. आमच्या अगोदरच्या संचालक मंडळाने जो आदर्श निर्माण केला आहे याचा तुम्हा-आम्हा सर्व सभासदांना सार्थ अभिमान आहे. या सर्वसाधारण सभेमध्ये सभासद बांधिलकी म्हणून, सेवानिवृत्त सभासद सत्कार, नूतन मुख्याध्यापक स्वागत व सत्कार आणि सभासदपाल्य गुणगौरव उपक्रम ही संस्था राबवत आली आहे.

स्वभांडवल या एकाच गोष्टीवर फोकस करीत संस्थेने आजपावेतो मार्च २०२४ अखेर संस्थेचे भाग भांडवल ७ कोटी ९९ लाख इतके मिळवले आहे. कायम ठेव रुपये ६ कोटी २४ लाख, संजीवनी ठेव रुपये १ कोटी ५८ लाख रुपये आहे. तालुक्यातील शाळा सेवकांची गरज ओळखून अडचणी सोडवण्याचं काम करून नियमित कर्ज फेड करून सभासदांनीही ऑडिट वर्ग’ अ ‘चांगल्या पद्धतीने कायम ठेवलेला आहे. ही संस्था सर्वांची आहे. सर्व संचालक समान पातळीवर आहोत असे आम्ही मानतो त्यामुळे विरोधक म्हणून जागाच राहत नाही. पतसंस्थेत फक्त हिताचाच विचार केला जातो. म्हणून खेळीमेळीत निवडणूक होऊन, माझी चालू आर्थिक वर्षासाठी चेअरमन म्हणून निवड झाली. सर्व संचालक मंडळ सहकार्याची भूमिका घेत आहेत. चालुआर्थिक वर्षात ७ कोटी ६३ लाख इतके कर्ज वाटप केले आहे आणि कर्ज वसूली ७ कोटी ६२ लाख इतकी झाली आहे. अशा रीतीने नियमित कर्ज फेड केल्याने दोघांची सभासदाची आणि संस्थेची प्रगती होत आहे. सन २०२४ अखेर येणे कर्जकोटी ९३ लाख इतकी आहे. संस्थेला झालेला एकूण ढोबळ नफा १ कोटी ४० लाख इ इतका आहे. निव्वळ नफा ८७ लाख ५९ हजार इतका आहे. नफा विभागणी करून क ८ % टक्के कर्जाला व्याजदर असतानाही ८ % टक्क्यानेच नफा सभासदांना वाटावा अशी शिफारस संचालक मंडळाने केली आहे. गेल्या वर्षापासून कर्ज कपाती बाबत एस.एम.एस. सुविधाही संस्थेने चालू केली आहे.

पतसंस्थेच्या विकासासाठी  व्हाईस चेअरमन रावसाहेब कोळेकर, माजी चेअरमन पंडित पाटील, संचालक रमेश डोके, गणेश यादव, बाबू सावंत, विनायक कलुबर्मे, दिलीप चंदनशिवे, शांतीलाल कदम, संगीता कदम, स्नेहा मसरे, तज्ञ संचालक तानाजी पाटील, माजी सचिव ज्ञानोबा फुगारे, सचिव बाळासाहेब जावळे आणि सर्व सल्लागार मंडळ, सुधाकर माळी, महेंद्र शिंदे, विठोबा आलदर, भिमाण्णा मुदरड्डी, संजय तेली, अरुण जाधव, सुखदेव गवळी, तुकाराम भोसले, ज्ञानेश्वर सावंत, सुरज पवार, विजयकुमार आसबे आणि सुशिलकुमार शिंदे प्रयत्नशील आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here