मंगळवेढा, दि.१६ : नगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळ, मंगळवेढा संचालित नगरपालिका कन्या शाळा क्रमांक- १ या शाळेत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, सामाजिक, बौद्धिक, भावनिक ,शारीरिक, व मानसिक विकास व्हावा यासाठी पालकांनी शाळेला दोन एल. ई. डी. टी. व्ही. भेट देण्यात आले.
दिनांक २६ जुलै २०२४ च्या झालेल्या पालक सभेत सर्व पालकांनी सर्वानुमते असा निर्णय घेतला की, पालक वर्गणीतून शाळेला एल. ई. डी. टी. व्ही. भेट देण्यात यावेत, यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिग्विजयसिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. तसेच त्यासाठी सर्व पालकांनी वर्गणी जमा करून १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून या शुभ मुहूर्तावर मंगळवेढा नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ.चरण कोल्हे त्यांच्या हस्ते या एल. ई. डी. टी. व्ही. संचाचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी मुख्याधिकारी श्री. कोल्हे यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना मार्गदर्शन करीत नगरपालिका कन्या शाळा क्रमांक १ ही शाळा १७ पटावरुन आज १२४ पटापर्यंत पोहचवली याबद्दल शाळेच्या सर्व शिक्षकांचे कौतुक केले. तसेच मंगळवेढा शहरात इयत्ता पहिलीच्या वर्गात १०४ विद्यार्थी दाखल केल्याबद्दल देखील सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले तसेच यापुढे देखील शाळेची प्रगती व्हावी. नगरपालिकेकडून सर्व प्रकारची मदत शाळेसाठी केली जाईल व शाळेच्या भौतिक सुविधाबाबत काही मागणी असेल तर त्या पुरविण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेनिमित्त सहभागी विद्यार्थ्यांचे मुख्याधिकारी श्री. कोल्हे यांनी कौतुक केले. शाळेसाठी ५००० रुपयांची मदत केल्याबद्दल दत्तात्रय बुरुंगले यांचा सत्कार करण्यात आला. इयत्ता दुसरीतील शरयू सावंजी व पियुशसिंग राजपूत यांचा विविध स्पर्धा परीक्षेत उज्वल यश मिळवलेबद्दल मुख्याधिकारी श्री डॉ . चरण कोल्हे साहेब यांच्या शुभहस्ते ट्रॉफी व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी नगरपालिका कार्यालयीन अधीक्षक सचिन मिसाळ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिग्विजयसिंग राजपूत, उपाध्यक्ष यल्लाप्पा लोहार, सदस्य चंद्रकांत कोंडूभैरी, मुख्याध्यापक अरविंद क्षीरसागर,श्रीमती आशा वाले व पालक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय चेळेकर यांनी तर आभार मारूती दवले यांनी मानले .