श्रीकांत मेलगे, ब्युरो चीफ झेप संवाद न्यूज
मंगळवेढा, दि.१५ : समाजासाठी आपण काहीतरी देणे लागतो ही भावना कमी होत चालल्यामुळे अलीकडे दातृत्वाचा झराच आटत चालला असल्याचे चित्र आपल्याला नेहमीच सामोरे येते. परंतु या बाबीला छेद देत मरवडेकरांनी आज स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विविध मार्गाने मदत करत दातृत्वाचा झरा आटला नाही तर अजूनही तो अखंडित वाहत असल्याचे समाजाला दाखवून दिले आहे.
आजवर मरवडेकरांनी विविध सामाजिक उपक्रम राबवित आपले दातृत्व साऱ्या देशाला दाखवून दिले आहे. गेली पंचवीस वर्ष छत्रपती परिवाराच्या माध्यमातून सामाजिक काम होत असताना विविध उपक्रमासह छत्रपती परिवाराचे संस्थापक सुरेश पवार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या लेकीचं झाड या अभिनव उपक्रमाचे देशभर कौतुक होऊन त्याचे ठिकठिकाणी अनुकरण करण्यात आले. महाराष्ट्रात आघाडीवर असलेल्या सकाळ माध्यम समूहाच्या वतीने नाले, ओढे, तलाव या ठिकाणच्या गाळ काढण्याच्या उपक्रमात तर मरवडेकरांनी भरभरून मदत केली. झेप परिवाराच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांसाठी राबवल्या जात असणाऱ्या वुई सेव्ह मरवडेकरांनी मदतीचा हात नेहमीच पुढे केलेला आहे.
कोरोना सारख्या भीषण परिस्थितीत आपले जगणेच मुश्किल होऊन बसले असताना आपल्या सहकारी बांधवांच्या मदतीने प्राचार्य राजेंद्र पोतदार, राष्ट्रवादीचे नेते लतिफ तांबोळी व सहकारी तसेच छत्रपती परिवार यांनी हजारो गरजू कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य किटची मदत करून एक वेगळा आदर्श सर्वासमोर ठेवला होता. याच काळात छत्रपती परिवाराने आशा वर्कर, आरोग्य सेविका, मदतनीस यांना केलेली रोख रकमेची मदत केली तसेच कोरोना काळात राष्ट्रवादीचे नेते लतिफ तांबोळी, तात्कालीन सरपंच नितीन घुले, उपसरपंच मिनाक्षी सूर्यवंशी, मरवडे ग्रामपंचायतीचे विरोधी पक्षनेते संजयकुमार पवार, प्रहार संघटनेचे प्रा.संतोष पवार यासह ज्ञात अज्ञात व्यक्तीने केलेल्या मदतीमुळे अनेक ग्रामस्थांचे प्राण वाचले हे नेहमीच आठवणीत राहणार आहे. अशा अनेक उपक्रमात मरवडेकरांचे आपले दातृत्व दिसून आलेले आहे. मरवडे येथील रयत शिक्षण संस्थेच्या हनुमान विद्यालयाची भव्य वास्तू मरवडे व पंचक्रोशीतील असंख्य दानशूर मंडळींच्या योगदानातून उभारली गेली आहे. गाव यात्रेचे औचित्य साधून पैलवान दामोदर घुले, माजी सरपंच दादासाहेब पवार, अशोक पवार, डॉ.माणिक पवार व गावातील प्रतिष्ठित मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत असलेल्या कुस्ती आखाड्याशी ग्रामस्थांनी नेहमीच सढळ हाताने बक्षिसे दिली आहेत. ग्रामदैवत सिंहगड महाराज या इतर दैवतांच्या कार्यक्रमासाठी व उभारणीसाठी मरवडेकर नेहमीच अग्रस्थानी असतात.
आता आज ७८ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जि. प. प्रा. शाळा मरवडे ( मुले ), ता. मंगळवेढा येथे स्वातंत्र्य दिनी ग्रामस्थांकडून शाळेला विविध स्वरुपाची मदत करण्यात आली. मरवडे भूषण प्रा. बाळासाहेब भगरे यांनी शाळेच्या प्रवेशद्वाराची कमान , गेट तयार करुन बसवून दिले. पोमसिंग राठोड यांनी ४२ इंच – दोन अँड्रॉइड टीव्ही रक्कम – ३०,०००/- रुपये, धन्यकुमार पाटील व मित्रपरिवार यांचेकडून अहुजा कंपनीचा स्पीकर सेट १६ ,०००/- रुपये, गणेश रामचंद्र पाटील यांनी – ६ खुर्च्या – २,४०० /- रुपये, निलेश साबळे यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी पाच घड्याळे बक्षीस-१५००/-, रमेश बुरुंगले -शाळेसाठी कलर- ६५००/- रुपये, दादासाहेब पवार यांच्याकडून ऑफिस खोलीसाठी मॅट- ३,०००/- रुपये, दादासाहेब भगरे यांनी शालेय परिसर स्वच्छता जेसीबी भाडे २०००/- रुपये, आप्पासाहेब कोरे व संग्राम पवार यांनी शालेय जनरल रजिस्टर लॅमिनेशन करून देणे साठी मदत, गुलाब इनामदार यांच्याकडून शाळेत रंग देणे मजुरी मोफत, तर गणेश भारत जाधव यांचेकडून ऑफिस खूर्ची ५५००/- रुपये, हनुमंत दुधाळ यांचेकडून सर्व मुलांना 50 किलो लाडूचे वाटप करण्यात आले. ग्रामपंचायत मरवडे यांचेकडून गावविकास आघाडीचे प्रमुख दत्तात्रय गणपाटील, सरपंच अंजना चोधरी, उपसरपंच दिक्षा शिवशरण यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मुलांना बिस्किट पुड्यांचे वाटप करण्यात आले.
प्रत्येकाच्या ठायी समाजासाठी आपण काही तरी देणे लागतो ही भावना असणे गरजेचे आहे. तो गुण आणि सामाजिक बांधिलकी जोपासून समाजकार्य करणारे व दातृत्वाची भावना जपणाऱ्या व्यक्ती मोठ्या मनाच्या असतात त्यामुळे एक मरवडेकर म्हणून आपल्याला नेहमीच अभिमान वाटतो कारण आपण सगळे अशा चांगल्या गोष्टी करीत आहात अशी प्रतिक्रिया साऱ्या मरवडेकरकडून व्यक्त केली जात आहे.