मी जनतेची सेवक ; आपला विश्वास सार्थ ठरवीत देईन विकास कामाला प्राधान्य : खासदार प्रणिती शिंदे

खासदार प्रणिती शिंदे यांनी मरवडे, डिकसळ, भालेवाडी या गावच्या ग्रामस्थांशी साधला संवाद

मंगळवेढा, दि.१५ : सोलापूर लोकसभा निवडणुकीमध्ये पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून माय बाप जनतेने माझ्या विजयात सिंहाचा वाटा उचलला त्याबद्दल मी त्यांच्या कायमस्वरूपी ऋणातच राहणे पसंत करते. मी जनतेची सेवक असून आपला विश्वास सार्थ ठरवीत विकास कामाला माझे प्राधान्य असेल असे प्रतिपादन नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केले.

सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवेढा तालुक्यातील मरवडे, डिकसळ, भालेवाडी या गावांना भेटी देत लोकसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजयी केल्याबद्दल जनतेचे आभार मानले. यावेळी त्यांनी शासकीय अधिकारी यांना सोबत घेऊन ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेतल्या.

या गावातील ग्रामस्थांशी संवाद साधताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, गेल्या दहा वर्षांमध्ये पदावर असलेल्या खासदारांनी जनतेची निराशा केली. या लोकसभा निवडणुकीत मला भरघोस मतांनी निवडून दिले. मी गेल्या पंधरा वर्षापासून आमदार म्हणून सेवा केली आहे,आता खासदार म्हणून संधी मिळाली आहे. मिळालेल्या संधीचं सोनं करीत मी फक्त विकास कामाला प्राधान्य देईन. विकास कामाला प्राधान्य देत असताना अधिकाऱ्यांनीही कर्तव्य निष्ठेने साथ द्यावी, अन्यथा कुणाची गय केली जाणार नाही. जनतेची कामे करणे, हीच मी सर्वस्व समजते. मी स्टंटबाजी करत नाही.

मरवडे येथे नवनिर्वाचित खासदार म्हणून प्रणिती शिंदे यांचा मरवडेकरांच्यावतीने सरपंच अंजना हरिदास चौधरी यांनी सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मरवडेकरांच्या वतीने धोकादायक बनलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला नवीन इमारतीची मंजुरी मिळावी, भरधाव वाहणाऱ्या वाहनावर नियंत्रण आणण्यासाठी गतिरोधक उभा करावे, मरवडे- डोणज रस्ता दुरुस्त व्हावा, कॅनॉलच्या पात्रातील स्वच्छता व दुरुस्ती व्हावी, काळ्या ओढ्याच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा, रात्री मिळणारी वीज, दिवस पाळीत मिळावी यासह गावातील अन्य मागण्यांचे निवेदन खासदार शिंदे यांनी स्वीकारले.

या आभार दौऱ्यात नागरिक, शेतकरी बांधवांनी मांडलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधित विभागाचे शासकीय अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या. आपल्या अनेक समस्या तत्काळ मार्गी लागल्याने व प्रश्नांचे निराकरण होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

खासदार प्रणिती शिंदे यांच्या मरवडे, तळसंगी, भालेवाडी दौऱ्यात यांच्या समवेत प्रणिती भालके, जिल्हा कार्याध्यक्ष ॲड. नंदकुमार पवार,मंगळवेढा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत साळे , खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्वेश्वर आवताडे, ॲड.रविकिरण कोळेकर तसेच संबंधित गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, मान्यवर नेते मंडळी, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here