अंशकालीन निदेशकांना पदस्थापना द्यावी ; सोलापूर जिल्हा शिक्षक समितीची मागणी

सोलापूर, दि.12 : कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण या विषयाचे अतिथी निदेशक म्हणून काम केलेल्या सर्व स्वयंसेवकांना प्रकल्प संचालक यांचेकडील दि.12 जुलै 2024 च्या पत्रानुसार सरसकट फेर पदस्थापना द्यावी अशी मागणी शिक्षक समितीच्या सोलापूर जिल्हा शाखेने शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्याकडे केली आहे.

याबाबतीत न्यायालयाने निर्देश दिलेल्या स्वयंसेवकांना पदस्थापना द्यावी असा आदेश प्रकल्प संचालक यांनी दि. 1 जुलै रोजी दिला होता. त्यानुसार शिक्षक समितीने दि. 8 जुलै पासून सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यानुसार दि. 9/8/2024 रोजी न्यायालयात गेलेल्या 17 जणांना पदस्थापना देण्याचा आदेश मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिला. न्यायालयात गेलेल्या उर्वरित 15 जणांना देखील आदेश द्यावेत या मागणीसाठी संबंधित निदेशकांना घेऊन शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष सुरेश पवार यांनी दि. 9 आँगष्ट रोजी तत्काळ उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती स्मिता पाटील, शिक्षणाधिकारी कादर शेख यांची भेट घेऊन पाठपुरावा केला होता.

अतिथी निदेशकांच्या प्रश्नी सोलापूर जिल्हा शिक्षक समिती न्याय देण्यासाठी सतत पाठपुरावा करीत असल्याची माहिती मिळाल्याने न्यायालयीन लढ्यात नसलेल्या मात्र पूर्वी काम केलेल्या जिल्ह्यातील जवळपास 50 स्वयंसेवकांनी गेल्या दोन दिवसांत जिल्हा शिक्षक समितीशी संपर्क साधला होता. त्या अनुषंगाने मा. प्रकल्प संचालक यांच्या कडील दि. 12/7/2024 च्या पत्रानुसार सन 2012 व सन 2016 ते 18 पर्यंत काम केलेल्या निदेशकांना पुन्हा पदस्थापना द्यावी अशा मागणीचे निवेदन शिक्षक समितीचे नेते मो.बा. शेख, बसवराज गुरव, सुनील कोरे , संतोष हुमनाबादकर यांनी जिल्हाभरातून आलेल्या निदेशकांच्या उपस्थितीत केली. यावेळी शिक्षणाधिकारी कादर शेखसो यांनी सदरची सर्व माहिती संकलित करुन वरिष्ठ कार्यालयाच्या मार्गदर्शना नुसार कार्यवाही करु अशी ग्वाही दिली. तसेच सर्व गटशिक्षणाधिकारी यांच्या V. C. मध्ये ही माहिती जिल्हा परिषदेकडे त्वरीत सादर करण्याच्या सूचना या शिष्टमंडळाच्या समक्ष दिल्या.

शिक्षक समिती विद्यार्थी, शिक्षण व शिक्षक हितासाठी धडपडणारे संघटन असल्याची भावना सर्व अतिथी निदेशकांनी बोलून दाखविली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here