प्रिय…

आज जागतिक मैत्री दिन, या दिवसाच्या निमित्ताने विशेष लेख-

प्रिय…

तुझी आणि माझी मैत्री सात जन्माची…अगदी त्याच्या अगोदरपासूनची…तू नेहमीच माझा होता…माझा आहेस…आणि माझाच मित्र म्हणून कायम राहणार आहेस, याची खात्री आहे मला…

आपली मैत्री कशी झाली, याचा मला अजून उलगडा होत नाही. पण, एक खरं आहे गड्या, शाळेत असल्यापासून आपली दोस्ती पक्की होती. त्याचा धागा अजूनही घट्ट आहे तेवढाच…आपल्या मैत्रीचे धागे तोडायला अजून कुणी जन्मला नाही. कारण, आपली मैत्रीच मुळात विश्वासाच्या धाग्यानं बांधलीय. तो धागा मात्र तोडू नकोस मित्रा…माझी शप्पथ आहे तुला…तुला आठवतंय का…मी तसा लहानपणापासूनच खूप जिद्दी आहे. तू मात्र नेहमीच समजूतदारपणा दाखवला आहेस. समजूतदारपणा हा तुझा स्थायीभावच आहे.

प्रिय…

खरं म्हणजे मी पाहतोय तुझी आवड-निवड वेगळी…माझी वेगळी…तुझ्या सवयी वेगळ्या…माझ्या अगदीच निराळ्या…तरीही तुझं आणि माझं मैत्रीचं नातं कसं काय, हे मला अजून समजलं नाही.

प्रिय…

शाळेत असल्यापासून तुझी आणि माझी मैत्रीची वीण घट्ट झाली. खरं सांगू, मित्रा…वर्गात एवढे सगळे विद्यार्थी असताना तुझी आणि माझीच मैत्री का बरं व्हावी. ऑफिसात एवढे सर्व सहकारी असताना खऱ्या मैत्रीची व्याख्या तुझ्याकडूनच मला का कळावी? खरं सांग, मित्रा…आपल्या दोघांत अस्सं कोणतं रसायन आहे की तुझं आणि माझं जमतं. कोणतं रसायन आहे की, तुझा आणि माझा रंग एक होतो. कित्येक दिवसांपासून मी त्याचा शोध घेतोय, पण त्याचं उत्तर मला मिळत नाही.

प्रिय…

तसा तू खूपच शांत, संयमी आहेस, हे माहित आहे मला. तूच मला नेहमी समजून घेतलं आहेस. चूक की बरोबर यातलं चूक किंवा बरोबर हे तुला चांगलं माहित असतानाही मुद्दाम तू मला जे चूक वाटतं, त्याला तू चूक म्हटलास आणि मला जे बरोबर वाटलं, त्याला तू बरोबर म्हटलास…कशासाठी आणि का..?

प्रिय…

म्हणतात ना, प्रत्येक यशस्वी पुरुषांमागे एका स्त्रीचा हात असतो. पण, खरं सांगू का, माझ्या यशासाठी मात्र तूच माझ्या मागे नाही तर नेहमी बरोबरीत राहिला, हे आठवतंय मला…ते दिवस मी कसे विसरीन रे…

प्रिय…

मी कोणताही निर्णय घेताना तूच मला आधार असायचा…तुझ्या फक्त आधाराने मी कित्येक वेळा `एव्हरेस्ट` सर केलाय. काय ताकद आहे गड्या तुझी…मला कधी समजले नाही. संकटातही तू मला समजावयाचा. तुझ्याशी किती वेळा बोलू…आणिक कित्ती-कित्ती सांगू, असं मला व्हायचं. किती मोबाईलवरूनही बोललं तरी तुझ्याशी बोलावंसं वाटायचं. तुझ्याशी बोलून मी मनमोकळा व्हायचो. माझं ओझंही मी तुझ्या खांद्यावर द्यायचो. पण, तू कधीच थकला नाहीस, दमला नाही, एवढी ऊर्जा तुझ्याकडे आली कुठून रे…

प्रिय…

आठवताहेत ते कॉलेजमधले दिवस…कॉलेजात नेहमी तुझा किंवा माझाच पहिला नंबर असायचा. पण, तू कधीच तुझाच नंबर कायम पहिला येण्यासाठी माझ्याशी दोस्ती तोडली नाहीस. एवढा समजूतदार कसा रे तू…

प्रिय…

कोणताही निर्णय तुझ्याआधी मीच घ्यायचो. (म्हणजे तशी ती माझी जुनी सवय आहे.) पण, तू वडिलधाऱ्या माणसांसारखा मला सल्ला द्यायचा. तुझा सल्ला मला नेहमीच आवडायचा.

प्रिय…

हल्ली तू माझ्यावर रागावलाय, असं वाटतंय. खरं सांगू…मी तुझ्यावर कधीच रागावलो नाही, रागावू शकत नाही, रागावणारही नाही. किंबहुना, तो माझा हक्कही नाही. हक्कांच्या गोष्टी तशा तू कधीच केल्या नाहीत, हे मला माहित आहे.

प्रिय…

मित्र एकत्र येतात, मैत्री घट्ट होते. नंतर या-ना-त्या कारणाने नाती तोडली जातात, असं मी ऐकलं आहे. पण, तू मात्र तस्सं कधी करू नकोस. माझं बोलणं तुला आवडत नसेल किंवा तुला त्रास होत असेल तर मी तुझ्याशी अबोला ठेवीन. शेवटी, आपली मैत्री चार दिवसांची कधीही नव्हती आणि ती असणारही नाही. मी तुझा होतो, तुझा आहे आणि तुझाच राहणार…पण, मित्रा, मैत्रीचा अंत एवढ्या छोट्या कारणानं नको…मला माहित आहे, ज्या-ज्या वेळी मी चुकतो, त्यावेळी सावरायला तूच असतो नेहमी. मला माहित आहे, तू समजूतदार आहेस. तू समजून घेशील…कारण, तू माझा मित्र आहेस.

 

फक्त तुझाच….छोटा दोस्त

– डॉ. मिलिंद आवताडे,

महापारेषणचे जनसंपर्क अधिकारी तसेच पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया (PRSI) या देशातील जनसंपर्क क्षेत्रातील शिखर संस्थेच्या मुंबई चॅप्टरची नवीन कार्यकारिणी सचिव म्हणूनही ते कार्यरत आहेत.

जनसंपर्क क्षेत्राचा विकास, जनसंपर्क क्षेत्राबद्दल समाजात जाणीवजागृती, जनसंपर्क मूल्यांची जोपासना, अनुभव आणि ज्ञानाचे आदान-प्रदान, जनसंपर्क क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, जनसंपर्क क्षेत्रातील चांगल्या कामाचा गौरव, जनसंपर्क क्षेत्रातील संशोधनास प्रोत्साहन, जनसंपर्काशी संबंधित विविध साहित्य प्रकाशित करणे आदी विषयांवर पीआरएसआय ही संस्था भारतात १९६६ पासून कार्यरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here