मंगळवेढा, दि.०१ : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांची इस्लामपूर येथे बुधवारी दि.३१ रोजी भेट घेऊन राज्यातील शैक्षणिक धोरणे व शिक्षकांच्या प्रश्नांबाबत चर्चा केली.
शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने दि.१५ मार्च २०२४ चा संच मान्यतेच्या संबंधी निघालेला शासन निर्णय रद्द व्हावा, विद्यार्थी गणवेश योजना शाळा व्यवस्थापन समितीकडे पूर्ववत ठेवावी, जुनी पेन्शन योजना लागू करावी, दि.०१ नोव्हेंबर २००५ पूर्वी पदभरती जाहीरात निघालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करण्यासाठी विकल्प भरुन घ्यावेत, महाराष्ट्रातील रिक्त शिक्षकपदे व अधिकारी पदे भरली जावीत, शिक्षकांना आश्वासित प्रगती योजना करावी इत्यादी प्रश्नांवर सुमारे पाऊण तास चर्चा झाली. तसेच सातत्याने राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांमुळे शैक्षणिक गुणवत्तेवर होणारा परिणाम याबाबतीत तपशीलवार चर्चा करण्यात आली.
आमदार जयंतराव पाटील यांनी हे सर्व प्रश्न समजून घेऊन महाराष्ट्र हे शैक्षणिक दृष्ट्या अग्रेसर असणारे राज्य राहिले पाहिजे यासाठी खासदार शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली धोरणे आखली जातील अशी ग्वाही दिली. तसेच राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रात नव्याने निर्माण होत असलेल्या प्रश्नांसंबंधी चर्चा घडवून आणण्यासाठी खासदार शरदचंद्र पवार यांच्या समवेत चर्चेसाठी शिक्षक समितीच्या पदाधिकारी यांची लवकरच बैठक घेऊ असेही आश्वस्त केले.
यावेळी शिक्षक समितीचे ज्येष्ठ नेते विश्वनाथ मिरजकर, माजी राज्याध्यक्ष काळूजी बोरसे पाटील, किरण गायकवाड, केदू देशमाने, सोलापूर जिल्हाध्यक्ष सुरेश पवार, सांगलीचे जिल्हाध्यक्ष माणिकराव पाटील, सांगली शिक्षक बँकेचे माजी चेअरमन शशी भागवत, शशिकांत बजबळे , रमेश पाटील, चंद्रकांत पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस संजय पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.