सोलापूर, दि.२८ : १ नोव्हेंबर २००५ नंतर शासकीय सेवेत आलेल्या सर्व शासकीय,निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या एकमेव मागणीसाठी आज महाराष्ट्र राज्य पेन्शन संघटना यांच्या वतीने पेन्शन आक्रोश मोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे. या पेन्शन आक्रोश मोर्चासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
आज रविवार दि.२८ जुलै रोजी सकाळी १२ वाजता डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन पार्क चौकातून हा मोर्चा निघणार आहे. सोलापूर जिल्हा परिषदेसमोरील पूनम गेट समोर या मोर्चाची सांगता होणार आहे. दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत दिवसभर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
जुनी पेन्शन योजनाच हवी म्हणून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यांच्यावतीने आजपावतो विविध आंदोलने करण्यात आली. या आजपर्यंतच्या संघर्षाने अनुकंपा योजना,कुटुंब निवृत्तीवेतन,रुग्णता निवृत्तीवेतन, मृत्यू आणि सेवानिवृत्ती उपदान, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी जाहिरात/अधिसूचना आणि 1 नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन आदी. लाभ मिळालेले आहेत.आता उर्वरित लाभांसाठी लढा उभारला जात आहे.
एक दिवस स्वतःसाठी, स्वतःच्या उज्ज्वल भविष्यासाठी, कुटुंबाच्या सुरक्षितता आणि आर्थिक स्थैर्यासाठी काढून या पेन्शन आक्रोश मोर्चात सोलापूर जिल्ह्यातील विविध विभागात काम करणारे पेन्शन फायटर मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने आंदोलनास पाठिंबा
जुनी पेन्शनच्या मागणीसाठी उद्या रविवार दि. २८ रोजी निघणाऱ्या भव्य मोर्चा व धरणे आंदोलनात जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांनी सहभागी व्हावे असे आवाहन सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने करण्यात आले आहे. सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने दि. २८ रोजी पुकारण्यात आलेल्या आंदोलनांस शिक्षक समितीने जाहीर पाठिंबा दर्शविला असून सर्व कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे सोलापूर जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक विभागातील सर्व कर्मचारी या आंदोलनात सहभागी होऊन आक्रोश मोर्चात सहभागी होणार आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी व सध्याच्या योजनेविषयी आपला रोष व्यक्त करण्यासाठी हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनास पाठिंबा दर्शविण्याचे आवाहन शिक्षक समितीच्या जिल्हा शाखेने केले आहे.
त्यामुळे विविध संवर्गातील सर्व कर्मचाऱ्यांनी देखील अभी नही तो कभी नही या इराद्याने हे आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार केला असल्याचे शिक्षक समितीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सुरेश पवार यांनी झेप संवाद न्यूजशी बोलताना सांगितले.