लाडक्या शाळा – हम भी कुछ कम नहीं ! आता राज्यातील शाळात रंगणार, मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा उपक्रम ; लाखो रुपयांची बक्षिसे

श्रीकांत मेलगे, ब्युरो चीफ – झेप संवाद न्यूज

महाराष्ट्र राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरिता ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-२’ हे अभियान राबवण्यात येणार असून गतवर्षी राबवण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमामुळे राज्यातील शाळांना नव संजीवनी देण्याचे काम झाले होते. विजेत्या शाळांना लाखो रुपयांची बक्षिसे देण्यात आल्यामुळे व यावर्षीही उपक्रम राबवला जात असल्याने अनेक शाळा हम भी कुछ कम नही हे दाखवून देण्याचा निर्धार केला आहे.

सन २०२३-२४ मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अनोखे स्पर्धात्मक अभियान राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरीता दि.०१.०१.२०२४ ते दि.१५.०२.२०२४ या कालावधीत राबविण्यात आले. या अभियानास विद्यार्थी व शिक्षकांबरोबरच माजी विद्यार्थी, पालक व शिक्षणप्रेमी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. जवळपास ९५% शाळांमधील सुमारे २ कोटी विद्यार्थी या अभियानांतर्गत विविध उपक्रमात सहभागी झाले होते. त्यामुळे हे अभियान मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरले. या अभियानातील काही उपक्रमांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील झाली आहे.

या अभियानात तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर यशस्वी ठरलेल्या शाळांना रोख रकमेच्या स्वरुपात पारितोषिके देण्यात आली व या रकमेचा विनियोग शाळांच्या गरजेनुसार करण्याची मुभा देखील शाळा व्यवस्थापनास देण्यात आली. त्यामुळे या शाळांना तातडीच्या गरजा भागविण्याकरीता निधी उपलब्ध झाला. अर्थात या भौतिक फायद्यापेक्षा विद्यार्थ्यामध्ये तसेच शिक्षकांमध्ये एक प्रकारचे नवचैतन्य निर्माण होऊन अनेक सकारात्मक बदल निदर्शनास आले. विविध प्रकारच्या चाकोरीबाहेरील स्पर्धात्मक उपक्रम राबवून विद्यार्थ्यामध्ये स्पर्धात्मक वृत्ती निर्माण होऊन त्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना मिळावी व त्यांना खऱ्या अर्थाने बाह्य जगाची ओळख व्हावी हा या अभियानाचा मूळ हेतू होता व तो मोठ्या प्रमाणावर साध्य करता आला.

आता यावर्षीही म्हणजेच सन २०२४-२५ मध्ये देखील मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा-टप्पा २ हे स्पर्धात्मक अभियान काही नवनवीन उपक्रमांसह राबविण्यात येणार आहे.

याबाबत महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय काढत या उपक्रमाची माहिती दिली आहे.
१. अभियानाची व्याप्ती-: i) राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांनी सदर अभियानात सहभागी होणे अपेक्षित आहे.

ii) या अभियानासाठी शाळांची विभागणी अ) शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व ब) उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा अशा दोन वर्गवारीत करण्यात येत आहे. याचा अर्थ प्राथमिक स्तरापासून राज्य स्तरापर्यंत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनाच्या शाळांशी स्पर्धा करणार नाहीत. प्रत्येक स्तरावरील विजेता या दोन्ही वर्गवारीसाठी स्वतंत्रपणे निवडण्यात येईल.

सदर अभियान अ) बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्र ब) वर्ग अ व वर्ग ब च्या महानगरपालिकांचे कार्यक्षेत्र तसेच क) उर्वरित महाराष्ट्र अशा स्तरांवर राबविण्यात येईल.

२. अभियानाची उद्दिष्टे :-

i) शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, क्रीडा इत्यादी घटकांबाबत जागृती करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना देणे.

ii) शासनाच्या ध्येय धोरणाशी सुसंगत अशा शालेय प्रशासनाच्या बळकटीकरणास चालना देणे.

iii) शालेय शिक्षणाच्या दृष्टीकोनातून सर्वाधिक महत्वपूर्ण असलेल्या शैक्षणिक संपादणूक या घटकाच्या वृद्धीस प्रोत्साहन देणे.

३. अभियानाचा कालावधीः-

i) दि. २९ जुलै ते दि.०४ ऑगस्ट, २०२४ हा कालावधी अभियानाच्या पूर्व तयारीसाठी असेल या कालावधीत अभियानाची माहिती राज्यातील सर्व शाळांमध्ये पोहोचेल. सर्व शाळांनी या अभियानात सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी याबाबत सर्वतोपरी प्रयत्न या कालावधीत करण्यात यावेत.

ii) दि.५ ऑगस्ट २०२४ रोजी औपचारिक कार्यक्रमाद्वारे अभियानाची सुरुवात होईल व हे अभियान एक महिना कालावधीसाठी असेल दि.०४ सप्टेंबर २०२४ रोजी अभियानाचा कालावधी पूर्ण होईल.

दि.०५ सप्टेंबर २०२४ ते दि.१५ सप्टेंबर २०२४ या कालावधीत मूल्यांकनाची प्रक्रिया पार पाडण्यात यावी.

iv) त्यानंतरच्या सुयोग्य दिनांकास या अभियानाचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होईल.

४. अभियानाचे स्वरूपः-

४.१ अभियानात सहभागी होऊन एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या शाळांना खालीलप्रमाणे गुणांकन देण्यात येईल.

अ) पायाभूत सुविधा – ३३ गुण ब) शासन ध्येय धोरण अंमलबजावणी ७४ गुण

क) शैक्षणिक संपादणूक – ४३ गुण

एकूण गूण अ + ब + क – १५०

उपरोक्त अ,ब व क येथे नमूद उपक्रमांपैकी कोणते उपक्रम अभियान कालावधीत राबविणे आवश्यक आहे व कोणत्या उपक्रमांचे गूणांकन मागील शैक्षणिक वर्षाच्या कामकाजावर अवलंबून असेल याच्या सविस्तर सूचना आयुक्त (शिक्षण) यांच्या कार्यालयाकडून यथोचित वेळी निर्गमित करण्यात येतील.

असे असेल कार्यक्षेत्र व बक्षिसे –
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत १९ युआरसी (तालुका दर्जा) मधील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेस युआरसी निहाय पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाकरिता अनुक्रमे रु.३.०० लक्ष, रु.२.०० लक्ष व रु.१.०० लक्ष इतक्या रकमेचे पारितोषिक अनुज्ञेय असेल. अशाच प्रकारचे पारितोषिक इतर व्यवस्थापनांच्या शाळांना अनुज्ञेय असेल.

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत दोन जिल्ह्यामधील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेस जिल्हा निहाय पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाकरिता अनुक्रमे रु.११.०० लक्ष, रु.५.०० लक्ष व रु.३.०० लक्ष इतक्या रकमेचे पारितोषिक अनुज्ञेय असेल. अशाच प्रकारचे पारितोषिक इतर व्यवस्थापनांच्या शाळांना अनुज्ञेय असेल.

मनपास्तरावर शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेस पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाकरिता अनुक्रमे रु.२१.०० लक्ष, रु.१५.०० लक्ष व रु.११.०० लक्ष इतक्या रकमेचे पारितोषिक अनुज्ञेय असेल. अशाच प्रकारचे पारितोषिक इतर व्यवस्थापनांच्या शाळांना अनुज्ञेय असेल.

वर्ग अ व वर्ग ब महानगरपालिका अंतर्गत १६ युआरसी (तालुका दर्जा) मधील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेस युआरसी निहाय पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाकरिता अनुक्रमे रु.३.०० लक्ष, रु.२.०० लक्ष व रु.१.०० लक्ष इतक्या रकमेचे पारितोषिक अनुज्ञेय असेल. अशाच प्रकारचे पारितोषिक इतर व्यवस्थापनांच्या शाळांना अनुज्ञेय असेल

वर्ग अ व वर्ग ब महानगरपालिका अंतर्गत दोन जिल्ह्यामधील (पुणे मनपा पिंपरी चिंचवड मनपा = १ जिल्हा, ठाणे मनपा नाशिक मनपा नागपूर मनपा १ जिल्हा) शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेस जिल्हा निहाय पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाकरिता अनुक्रमे रु.११.०० लक्ष, रु.५.०० लक्ष व रु.३.०० लक्ष इतक्या रकमेचे पारितोषिक अनुज्ञेय असेल. अशाच प्रकारचे पारितोषिक इतर व्यवस्थापनांच्या शाळांना अनुज्ञेय असेल.

मनपास्तरावर शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेस पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाकरिता अनुक्रमे रु.२१.०० लक्ष, रु.१५.०० लक्ष व रु.११.०० लक्ष इतक्या रकमेचे पारितोषिक अनुज्ञेय असेल. अशाच प्रकारचे पारितोषिक इतर व्यवस्थापनांच्या शाळांना अनुज्ञेय असेल.

तालुकास्तरावरील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या शाळेस अनुक्रमे रु.३.०० लक्ष, रु.२.०० लक्ष व रु.१.०० लक्ष इतक्या रकमेचे पारितोषिक अनुज्ञेय असेल. अशाच प्रकारचे पारितोषिक इतर व्यवस्थापनांच्या शाळांना अनुज्ञेय असेल.

जिल्हास्तरावरील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या शाळेस अनुक्रमे रु.११.०० लक्ष, रु.५.०० लक्ष व रु.३.०० लक्ष इतक्या रकमेचे पारितोषिक अनुज्ञेय असेल. अशाच प्रकारचे पारितोषिक इतर व्यवस्थापनांच्या शाळांना अनुज्ञेय असेल.

विभागस्तरावरील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या शाळेस अनुक्रमे रु.२१.०० लक्ष, रु.१५.०० लक्ष व रु.११.०० लक्ष इतक्या रकमेचे पारितोषिक अनुज्ञेय असेल. अशाच प्रकारचे पारितोषिक इतर व्यवस्थापनांच्या शाळांना अनुज्ञेय असेल.

बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रथम क्रमांकाची शाळा, अ व ब वर्ग महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रथम क्रमांकाची शाळा तसेच उर्वरित महाराष्ट्रातील प्रत्येक विभागातील प्रथम क्रमांकाच्या शाळा या राज्यस्तरावर एकमेकांशी स्पर्धा करतील. या स्पर्धेतून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी निवडलेल्या शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना अनुक्रमे रु.५१.०० लक्ष, ३१.०० लक्ष व २१.०० लक्ष इतक्या रकमेचे पारितोषिक अनुज्ञेय असेल. अशाच प्रकारचे पारितोषिक इतर व्यवस्थापनांच्या शाळांना अनुज्ञेय असेल.

कोणत्याही स्तरावर जिंकलेल्या पारितोषिकाच्या रकमेचा विनियोग करण्याचा अधिकार शाळांच्या गरजांचा प्राधान्यक्रम विचारात घेऊन संबंधित शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीस असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here